स्वातंत्र्याचा लढा झाला


स्वातंत्र्याचा लढा झाला


स्वातंत्र्याचा लढा झाला, 
बापूजी म्हणाले 'खेडयांकडे चला',

'चला' म्हणून तर गेले बापूजी, 
पण फिरकले कोण?

कोण्या बुडूख अंधारात, 
गुडूप निजलेल्या, 
दाटी-वाटीनं बुझलेल्या, 
बुझून विझून थिजलेल्या,
हिरव्या रानात भिजलेल्या, 
ठिपक्या ठिपक्या एवढुश्शा चिमुकल्या 
खेडयापाडयांकडे फिरकणार तरी कोण?

फिरकली ती एस.टी.
तांबडी माती उडवत, 
दिमाखात मिरवत, 
गावं गावं जोडत,
की गावात शहरं घुसवत.. 
तिचा लाल पिवळा रंग, 
संग शहरांशी करून गेला,
गावालाही चकचकाटाची 
स्वप्नं तेवढी दाखवून गेला..

झगझगत आली मागून लखलखणारी वीज
नीज उडवली तिने, 
गावं उजळवली तिने,
आणला रेडीओही तिने, 
तिनेच टी.व्ही. दाखवला, 
दिपून गेले डोळे,
'गाव' दिसेनासा झाला!

झाला झाला खणाणत टेलिफोनचा प्रवेश.. 
देश जोडला म्हणे त्याने,
केला पोस्टाचा भार कमी, 
...अंतरही कमी! 
केली आतुरता कमी! 
म्हणे माणूस जोडला, 
शब्दाशब्दाने सांधला, 
म्हणे दुरावा मोडला की वेळेत तोलला?

झाला गेला सारा बदल... 
आहे तो असा आहे!
शिक्षणाचं वारं आहे, 
प्रगतीला उधाण आहे,
लोकल ग्लोबल झालं 
ओझं संस्काराचं आहे! 

गाव कात टाकणारे, 
गाव नवे होणारे, 
हिरवे गाणे गाणारे, 
गाव वेगाने वाहणारे, 
आकाश कवेत घेणारे, 
माझ्या मनात मावणारे
मला पुकारते आहे...

Popular posts from this blog

Winter Trip To The Raigad Fort!!!

Trekking and night camping @ Ratangad

Trek Experience - Kalavantin Durg....कलावंतीण दुर्ग