गावाकडच्या मुली.....

शहरी आणि ग्रामीण या दोन संकल्पनांच्या विशिष्ट प्रतिमा आपण कायम आपल्या मनात जपत असतो. ग्रामीण राहणीमान, तेथील जीवन याची एक विशिष्ट चौकट आपल्या डोक्यात असते. विशेषतः गावाकडच्या मुली म्हणजे ‘गावंढळ’, ‘अडाणी’ किंवा ‘बिचाऱ्या’ अशीही एक धारणा आपण तयार केलेली असते. ही धारणा खरंच तेवढी खरी आहे का त्यामागची सामाजिक कारणे काय आहेत याचाच आढावा घेऊयात.

समाजसेवेची आवड असणाऱ्या एक ज्येष्ठ बाई भेटल्या होत्या. बोलता बोलता त्यांनी विषय काढला की गावाकडच्या मुलींचे फार हाल असतात असं ऐकलं. जर तुझ्या ओळखीतली एखादी मुलगी असेल तर सांग मी सांभाळेन तिला. घरकामाला पण उत्तम असतात तिकडच्या मुली. मला नेमका उद्देश लक्षात आल्याने मी अस्वस्थ झालो. गावाकडची मुलगी म्हणजे काय प्रतिमा आहे त्यांच्या डोक्यात हेच डोळ्यासमोर आलं. पण विचार करता करता लक्षात आलं की गावाकडची मुलगी म्हणजे डोक्यावर घागर घेऊन पाणी आणणारी, शेतात राबणारी आणि फार फार तर पायी पायी शाळेत जाणारी. यापलीकडे गावाकडची मुलगी शहराच्या चित्रात नसते. गावातल्या मुली खरंतर खूप लहानपणीपासून आपल्या भावंडांची आई बनून जातात. घर सांभाळतात. मन लावून अभ्यास करतात. कारण मुलींना आता शेतीच्या चक्रातून बाहेर यायचंय. स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आपल्या आई वडिलांचे झालेले हाल बघावे लागले पण इथून पुढे तरी त्यांना सुखात ठेवायचंय. हे स्वप्न जवळपास प्रत्येक मुलीच्या डोक्यात आहे पण वास्तव काय आहे?
आपल्या देशातली सगळ्यात फसवी जाहिरातबाजी म्हणजे बेटी बचाव. मुलगी शिकली तर प्रगती झाली ही ओळ गावातल्या आई बापाला कशी पटेल? मुलगी शिकायला बाहेर पाठवायची तर तिच्या सुरक्षेचं काय? जीव मुठीत धरून आई बाप तिला शिकायला परवानगी देतात. जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा जर कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असली तर कुणालाच मुलगी जन्मली म्हणून चिंता वाटणार नाही. घरातली आर्थिक परिस्थिती सगळ्यात जास्त समजते ती मुलीला. गावात राहणाऱ्या कित्येक मुली आपल्या वडलांचा खर्च वाढवायला नको म्हणून पुढे शिकत नाहीत. त्या आपलं स्वप्न आपल्या मनातच ठेवतात. गावातल्या आणि शहरातल्या मुलींच्या तुलनेचा हा विषय नाही. पण शहरातल्या मुलींना जेवढा वेळ स्वतःसाठी मिळतो तेवढा वेळ दुर्दैवाने गावातल्या मुलीला मिळत नाही. घरकाम, शेती, पाणी, वीज या गोष्टींशी संघर्ष करता करता त्यांच्या हातात अभ्यासाचा किती वेळ उरतो याचा विचार केला पाहिजे. खरंतर शहर आणि गाव ही स्पर्धाच एवढी विषम आहे की गावातली माणसं आपोआप मागे राहू शकतात. गावातली शाळा, तिथल्या सुविधा, कम्प्युटर चालू असणे ही मोठी गोष्ट आहे. अशा परिस्थितीत गाव स्पर्धेत कसं टिकणार? पण गावातली मुलं मुली एवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जेंव्हा आपली गुणवत्ता सिध्द करतात तेंव्हा ते यश असामान्य असतं.
खूप सर्व्हे मधून एक गोष्ट बाहेर येतेय की गावाकडे मुलांचं लग्न जमणं ही एक खूप अवघड गोष्ट होऊन बसलीय. त्यात शेती करणारा मुलगा असेल तर त्याला लवकर मुलगी मिळत नाही. आणि या गोष्टींचा विचार करताना सहजपणे मुलींना दोष दिला जातो. आजकाल गावातल्या मुलींना शेतकरी नवरा नकोय म्हणून तक्रार केली जाते. ही अपेक्षा त्यांच्याकडून का करायची? आपलं आयुष्य अस्थिर व्हावं असं शेतकऱ्याच्या मुलालाही आजकाल वाटत नाही. तो शेती सोडायचं स्वप्न पाहतोय. मग मुलींकडून अपेक्षा का? मुलींना शिकायचंय. त्यांना नव्या क्षेत्रात जायचंय. नव्या दिशा त्यांना खुणावताहेत. लग्नाचा प्रश्न आहे म्हणून त्यांनी त्यांच्या स्वप्नांना मुरड का घालायची? पण गाव आणि शहरात एवढी आर्थिक विषमता आहे की गावातल्या मुली ठरवूनही शिक्षण घेता घेता आपल्या पायावर उभं राहू शकत नाहीत. त्यांना रोजगार उपलब्ध नसतो. मजुरी करून शिकणार कधी? गावातल्या मुलीला पार्ट टाईम नौकरी किंवा मार्केटिंग क्षेत्रातले पर्याय पण उपलब्ध नसतात. आपण नवीन काय करू शकतो हे कळण्यासाठी इंटरनेट असेलच असं नाही. गावात आणि शहरात साम्य असेल तर एकच. मुलीला मोबाईल घेऊन देताना आई बापांना प्रचंड चिंता असते. खूप आई बाप असे आहेत ज्यांना मोबाईल ही मुलांची गरज वाटते आणि मुलींची चैन.
शहरात नियम बनवून किंवा प्रयत्नपूर्वक स्त्रियांच्या दृष्टीने सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. अगदी बस मध्ये स्त्रियांना किमान हक्काची जागा तरी मिळते बसायला. पण गावातल्या मुलींना अशा नियमित बस नसतात. जीप मध्ये प्रवास करताना असे नियम नसतात. गावातल्या मुलींच्या आणि शहरातल्या मुलींच्या आत्मविश्वासात पण खूप फरक असतो. गावातली मुलगी परंपरा, गाव, नातेवाईक अशा अनेक गोष्टींच्या ओझ्याखाली असते. आपली छेड काढणाऱ्या मुलाला भर रस्त्यात थोबाडीत द्यावी असं तिला मनातून वाटत असतं. पण लोक काय म्हणतील हा प्रश्न मोठा असतो. पुन्हा शत्रुत्व घेणं गावात परवडत नाही. गावं छोटी असतात आणि त्यामुळे या समस्या मोठ्या असतात. रात्री आठ वाजले की आजही कित्येक गावात शांतता पसरते. अंधार असतो. अशावेळी मुलींचा बाहेर पडण्याचा प्रश्न नसतो. मुलींनी सतत कुणाच्या तरी नजरेच्या टप्प्यात असणं ही सगळ्यात मोठी अट असते. आपल्यावर सतत कुणाचं तरी लक्ष आहे ही भावना फार आनंद देणारी नसते. पूर्णवेळ एक दडपण वागवता वागवता कुठेतरी कायमचा मानसिक त्रास होऊन जातो तो. बरं हे सगळं लग्न होईपर्यंत असं आई वडील गृहीत धरून असतात. त्यामुळेसुद्धा तरुण शेतकरी आत्महत्या करतो तेंव्हा एक सगळ्यात मोठी अडचण तो बायको समोर उभी करतो. तिला तिच्या आई वडिलांकडे आधार मिळेलच अशी शाश्वती नसते. सासुरवाडीला तिला सांभाळतील ही पण खात्री नसते. हे शेतीचं उदाहरण झालं. मजुरी करणाऱ्या घरातल्या मुलींची अवस्था तर फारच बिकट असते. अर्थात आपण ही सगळी अल्पभूधारक, दुष्काळग्रस्त प्रदेशातली गावं विचारात घेतोय. जिथे अजूनही साध्या सुविधांचा अभाव आहे. सगळे पक्ष पोचलेत पण योजना पोचलेल्या नाहीत.
वीज, पाणी, रस्ते या आपल्याला वरवर दिसणाऱ्या समस्या वाटतात. पण या गोष्टींमुळे गावातल्या स्त्रियांच्या आरोग्यावर वर्षानुवर्षे केवढा गंभीर परिणाम होतोय याचा मात्र फारसा विचार होत नाही. साधा चुलीचा विचार करूया. अजूनही गावातल्या चुली बंद झाल्यात असं नाही. पण पुरुष मंडळी मोठ्या हौसेने म्हणतात चुलीवरच्या भाकरीची मजाच काही और. आणि घरात गॅस असताना बळेच अधून मधून चूल पेटवायला भाग पाडलं जातं. या चुलीचा लाकडं आणण्यापासून ते चूल फुंकून तो धूर सहन करण्याचा त्रास मात्र स्त्रीने सहन करायचा. चुलीमुळे स्त्रियांच्या कित्येक पिढ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला याचा हिशोब करायची पण आपल्याला गरज वाटली नाही. आजही आपण या प्रश्नाकडे गंभीरपणे बघत नाही. गावातली सगळ्यात दुर्दैवी गोष्ट मुलींच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष. याबाबत जागृती करून प्रश्न सुटणार नाही. त्या स्त्रीला या सुविधा आर्थिक दृष्ट्या परवडल्या पाहिजेत. मुलींना आवश्यक असणाऱ्या कित्येक गोष्टी केवळ खर्चिक आहेत म्हणून टाळल्या जातात. या सगळ्या संकटावर मात करून गावातल्या मुली जगत असतात. आपलं आयुष्य घडवण्यासाठी संघर्ष करत असतात. शहरातल्या मुलींना पण संघर्ष कमी नाही. पण मुलभूत सुविधा सुद्धा मोठ्या कष्टाने मिळत असतील तर गावातल्या मुलींचा लढा किती मोठा आहे हे लक्षात येईल.
गावातल्या मुली असं वेगळं लिहिण्याचं कारण जेंव्हा कुठली सरकारी योजना, अभ्यासक्रम, रोजगाराची संधी निर्माण केली जाते तेंव्हा या मुलींचा डोक्यात विचार असणं खूप गरजेचं आहे. त्यांना लवकरात लवकर आत्मविश्वासाने स्वबळावर उभं राहता यावं म्हणून सुरुवातीपासून या गोष्टीवर विचार झाला पाहिजे. कविता राउत किंवा ललिता बाबर सारख्या मुलींच्या यशोगाथा या दृष्टीने महत्वाच्या आहेत. वेगळं क्षेत्र निवडण्याची, वेगळी स्वप्न पाहण्याची गरज आहे. पण त्यांची माहिती असणं महत्वाचं नाही का? शहरात अगदी ज्युनियर केजी पासून अमेरिकेत जायला काय तयारी केली पाहिजे आणि डॉक्टर व्हायला काय केलं पाहिजे याची तयारी केली जाते. मुलांचा कल लक्षात घेतला जातो. गावातल्या मुलीचा आपल्याला नेमकं काय करायचंय हे लक्षात येण्यात खूप वेळ जातो. मग त्या दिशेने तयारी आणि त्यातले अडथळे यांचा खडतर प्रवास सुरु होतो. त्यानंतर त्यातल्या काही मुली आपलं ध्येय गाठण्यात यशस्वी होतात. हे सगळं थोडं सोपं होऊ शकतं. जर गावातल्या मुलीचं अवघड जगणं नीट समजून घेता आलं तर.

Popular posts from this blog

Winter Trip To The Raigad Fort!!!

Trekking and night camping @ Ratangad

Trek Experience - Kalavantin Durg....कलावंतीण दुर्ग