हरवलेल्या गावाची गोष्ट

हरवलेल्या गावाची गोष्ट

तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी. त्या अगोदर आमच्या आई-वडीलांनी चिमणी कंदिलात दिवस काढले. चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल वाट पाहण्याचे दिवस संपले. चालून चपला झिझवणारी ही शेवटची पिढी.

लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी ही पिढी. लसूण-कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी ही पिढी. रानात दाना दाना वेचूनही चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी ही माझ्या आई-वडीलांची पिढी.

कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात हे तत्वज्ञान जगणारी ही शेवटची पिढी. कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजही नव्हता. माझ्या पिढीने बंद पडलेले टीव्ही कधीच भंगारात विकले नाहीत. वडीलांचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या. संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या. गेटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो. तुटलेल्या कॅसेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळपी बनवून आमच्यातले काही इंजिनियर झाले. आमच्या पिढीत मोठ्या भावाकडून वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तू लहान भावांकडे आल्या. नाती नात्याला आणि माणस माणसांना या नं त्या कारणाने जोडलेली होती.

गेल्या काही वर्षात गाव हरवलं. पहिली कुऱ्हाड गावाशेजारी खेटून असलेल्या बलदंड झाडांवर पडली. कारण घाताची सुरुवात अगोदर जे बोलू शकत नाहीत त्यांच्या मुलावर उठण्यापासून होते, आणि गावं भुंडी झाली. हळूहळू ऐसपैस घरांचे सिमेंटचे खुराडे झाले. माणूस मोकळी जागा दिसेल तेथे पाय रोवू लागला. अंगण आटले, मैदानं आकसली. गावाचा गरीब तोंडावळा बदलून माजुर्डेपणा वाढला. शेतीवरचं अवलंबन संपून घरोघरी नोकरदार आले. तुकडीकरण जमिनीचं झालं तसंच माणसांचं. माणसा-माणसांमधल्या नात्याचं. या बक्कळ पैशाचं करायचं काय, हा प्रश्न नव्यानं उभा राहिला. पांढरीतून माती हद्दपार होऊन डांबरी रस्ते आले. त्यावरून सुसाट दुचाक्या धावू लागल्या. ऑटोमोबाईल तंत्रज्ञानाचा रानटी अविष्कार असलेल्या या दोन - चारशे सीसीच्या रानटी गाड्या आणि त्यावर कानात बाळ्या अडकवलेली झिंझुरटी पोरं, आणि त्यांच्या कानातले कॉड, बाहेरच्या जगाशी असलेला संवाद बिलकुल बंद झाला.

नेट आलं, तंत्रज्ञान व्यसन झालं. चार पैसे देऊन काही जीबी प्रेम आणि अनलिमिटेड माणुसकी मिळणारी जाहिरात उद्या येईल. तिथेही अशीच गर्दी राहील, कारण या कंपन्या एकदा विकलेला माल परत घेत नाहीत, आणि वॉरंटी देऊनही माल खराब लागला म्हणून कुणी बदलायला माघारी येत नाहीत.

गाव पार पार हरवलं. 

ग्रामपंचायतीच्या मेम्बरशिपसाठी लोकं काठ्या कुऱ्हाडीनं भांडू लागली. कधीकाळी हाच गाव हाकेसरशी धावून यायचा. कुणाला दुखलं खुपलं कि गावाचा जीव गोळा व्हायचा. वडीलधारी लोकांच्या शब्दाला किंमत होती. पूर्वी बंधनं होती, पण त्या बंधनातच गंमत होती. गेल्या काही वर्षात गाव बदलला. बदलता बदलता अनोळखी झाला. आता तर त्याचा थांगपत्ताच नाही. तो हरवला. दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं, पण ते तरी गावापासून वेगळं होतंच कुठं???

का असे तर नाही की, या ग्लोबल व्हिलेजच्या कृष्ण-विवरात गाव नावाची वस्तू गिळंकृत झाली.... गावपण नावाची कन्सेप्टच आऊटडेटेड झाली...!!! 


Credit: सौरभ जाधव 

Popular posts from this blog

Winter Trip To The Raigad Fort!!!

Trekking and night camping @ Ratangad

Trek Experience - Kalavantin Durg....कलावंतीण दुर्ग